शेतीच्या वादावरून हत्या, आरोपीस जन्मठेप
-प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांचा निर्णय
गडचिरोली TODAY
गडचिरोली: शेतीच्या वादावरून जीवे ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेप व २५ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा गडचिरोली न्यायालयाने आज २ मार्च रोजी ठोठावली आहे. हा निर्णय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश उदय बा. शुक्ल यांनी दिला. समय्या अंकलु दुर्गम (४६) रा. रेंगूठा ता. सिरोंचा असे आरोपीचे नाव आहे.
मृतक राजक्का व्यंकटी बोल्हे (५०) रा. रेंगूठा व तिचे दोन सुना ३ नोव्हेंबर २०१९ रोजी आपल्या शेतात मुंग पेरणीचे काम करीत असतांना आरोपी समय्या अंकलू दुर्गम व त्याची पत्नी लक्ष्मी अंकलू दुर्गम हे शेतात कुर्हाड घेऊन आले व शेतीच्या कारणावरून वाद घातला. अशातच समय्या दुर्गम याने हातातील कुर्हाड घेऊन राजक्का बोल्हे या महिलेवर धावून आला व कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली. ही घटना पाहून फिर्यादी आपला जीव वाचविण्यासाठी गावाकडे पळत आली व सर्व हकीकत सासरे व्यंकटी बोल्हे यांना सांगितली. याप्रकरणी उप पोलिस स्टेशन रेंगूठा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस यंत्रणेने कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी, इतर साक्षीदारांचे बयान व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी समय्या अंकलू दुर्गम यास जन्मठेप व २५ हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील एस. यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले. गुन्हाचा तपास पोउपनि बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केला.
Post Comment
No comments