Breaking News

Crime | अखेर 'त्या' खून प्रकरणातील चार आरोपी गजाआड

Crime | अखेर 'त्या' खून प्रकरणातील चार आरोपी गजाआड
-महिनाभराच्या प्रयत्नानंतर क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघडकीस
गडचिरोली Today : कोरची पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या देवसूर-कटेझरी मार्गावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी कसून चौकशी केली असता, सदर इसमाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, एक महिन्याच्या अथक परिश्रमानंतर या क्लिष्ट अशा खुन प्रकरणी छत्तीसगड राज्यातील चार आरोपींना गजाआड टाकण्यात  गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.
कोरची पोलिस ठाण्याअंतर्गत देवसूर-कटेझरी मार्गावर 55 किमी पूर्व दिशेला 8 जानेवारी रोजी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. वैद्यकीय तपासणीअंती कोरची पोलिस ठाण्यात यासंदर्भात मर्ग दाखल करण्यात आला होता. सदरचा तपास पोलिस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले करीत होते. चौकशीअंती मृतदेह महेतर कुवरसिंग कचलाम (55) रा. खपौरखेडा ता. दुर्गकोंदल जि. कांकेर (छत्तीसगड) याचे असल्याचे निष्पन्न झाले. मात्र मर्गबाबत पोलिस अधीक्षक निलोत्पल यांना शंका असल्याने त्यांनी सखोल चौकशीचे आदेश उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दिले. यावरुन एक महिन्याच्या सखोल चौकशीअंती हा खून असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी संशयित म्हणून संबंधित चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती  संबंधित आरोपींनी खुनाची कबुली दिली. यावरुन गडचिरोली पोलिसांनी आरोपींवर कोरची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत अटक केली. 
आरोपींमध्ये यांचा समावेश
छत्तीसगड राज्यातील मुकेश बुधरुराम यादव (36), सौरभ राजेंद्र नागवंशी (27) दोघेही रा. मानपूर व रुपसिंग बाबुलराव तुलावी (27) व आसुराम देवजी तुलावी (36) दोघेही रा. आमाकोडे (सर्व छत्तीसगड राज्य) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पैसे परत न केल्याच्या कारणावरून खून
पोलिसांनी अधिक तपास केला असता संबंधित चौघांनी मृतक मेहतर कचलाम यास पैसे परत न केल्याचा कारणावरुन कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशाने बळजबरीने वाहनात पळवून नेत मारहाण करीत जीवानिशी ठार केल्याचे आरोपींनी कबूल केले.
चार दिवसांची पोलिस कोठडी
आरोपींना न्यायालयात हजर केले असतांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचे मार्गदर्शनाखाली कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर करीत आहेत.
 

No comments