Breaking News

गोंडवाना विद्यापीठ : 'या' योजनांचा विद्यार्थ्यांना होणार लाभ



- विद्यार्थ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन  
गडचिरोली TODAY  
गडचिरोली : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करता यावा, या उदात्त हेतूने गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाद्वारे विविध उपक्रम राबविले जातात. यातच विद्यार्थ्यांसाठी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके कमवा आणि शिका योजना, विद्यार्थी वैद्यकीय व सुरक्षितता मदत निधी, विद्यार्थी सहाय्यता निधी या महत्त्वाच्या योजना असून याची अंमलबजावणी करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या संलग्नित असलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 
या योजनांसाठी गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव ८ मार्च पर्यंत विद्यार्थी विकास विभागा च्या dsd.gug123@gmail.com या ईमेल पत्यावर  प्राचार्याच्या सहीनिशी सादर करावे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देव यांच्याशी संपर्क साधावा.

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके कमवा आणि शिका योजना
उच्च शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांवर श्रम संस्काराचाही वर्षाव आणि त्यांनी हा ठेवा निरंतर जपावा, या उदात्त हेतूने क्रांतिवीर बाबुराव शेडमाके कमवा आणि शिका योजना विद्यापीठाने परिक्षेत्रातील अतिदुर्गम व ग्रामीण भागात प्रवेशित महाविद्यालयांमध्ये सुरू केलेली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संपादन करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, मानवी श्रमाची प्रतिष्ठा जोपासणे, स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे, ज्ञानसेवक बनवणे, श्रम संस्कृतीची जाणीव निर्माण करणे, आदिवासींचे परंपरागत ज्ञान व संस्कृतीवर आधारित उपजीविकेचे साधन नवसंकल्पना म्हणून रुजवितांना मिळणाऱ्या कार्यानुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत होऊ शकेल.

विद्यार्थी सहाय्यता निधी 
गरीब विद्यार्थ्यांना विद्यापीठीय शिक्षण घेण्यासाठी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, वस्तीगृहातील राहण्याचा व जेवणाचा खर्च, पुस्तकांचा व इतर शैक्षणिक साहित्यांची खरेदी यासाठी येणारा खर्च व तत्सम इतर शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक सहाय्य करणे. विद्यापीठाद्वारे गरीब विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर योजनांसाठी सदर निधीतून रक्कम पुरविणे.

विद्यार्थी वैद्यकीय व सुरक्षितता मदत निधी
सर्व संलग्नित महाविद्यालय तसेच पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाचा अपघात अथवा मोठ्या आजारात वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

No comments