'या' मागणीसाठी शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास अडविला रस्ता
![]() |
आंदोलनात सहभागी शिवसेना पदाधिकारी व शेतकरी |
GADCHIROLI TODAY
कुरखेडा : कृषीपंपाला 16 तास विद्युत पुरवठा करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, डॉ. महेंद्र मोहाबंशी, तालुका प्रमुख पुंडलिक देशमुख यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी गुरनोली फाट्यावर चक्काजाम व जेलभरो आंदोलन केले. आंदोलनामुळे तब्बल दोन तास वाहतूक प्रभावित झाली होती.
कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा, गुरनोली, चिखली विद्युत फिडर वरील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला आठ तासाचा विद्युत पुरवठा होत आहे. त्यामुळे पिकाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी देता येत नाही. परिणामी पाण्याअभावी अनेकांचे प-हे वाळून गेले आहेत. ज्यांचे रोवणे झाले आहे, त्यांच्याही पिकाला पुरेसे पाणी होत नाही. त्यामुळे रोवणी केलेले पीकही करपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे कृषीपंपाला कमीत कमी 16 तास विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. तब्बल दोन तास शेतकरी रस्त्यावर बसून होते. त्यामुळे दोन्ही बाजुला वाहनांची रांग लागली होती. आंदोलनस्थळी विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता मुरकुटे यांनी भेट दिली. त्यांच्याशी चर्चेदरम्यान शेतकरी रोष व्यक्त करीत होते. यावेळी उपकार्यकारी अभियंता मुरकुटे यांनी वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करून लवकरच 16 तास विद्युत पुरवठा करण्याविषयी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. आंदोलनातील शेतकऱ्यांचा आक्रोश बघता पोलिस अधिकाऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्यासहित पदाधिकारी व शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्याची कार्यवाही सुरू केली. पोलिस स्टेशनल नेऊन त्यांची नंतर सुटका केली.
चोख पोलिस बंदोबस्त
चक्काजाम आंदोलनात विजय पुस्तोडे, राकेश खूने, विभाग प्रमुख गुणवंत कवाडकर, दशरत लाडे, सेवादास खुने, पुरुषोत्तम तिरगंम, धनिराम झोडे, बोरकर, दिगंबर नाकाडे, वासुदेव बहेटवार यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक दिनेश गावंडे, महिला पोलिस उपनिरीक्षक भावना भिंगारदेवे यांच्या नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Post Comment
No comments