जिल्हा बाल संरक्षण टीम व पोलीस पथकाने विवाह स्थळ गाठून थांबविला बालविवाह
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : चामोर्शी शहरात बालविवाह होणार असल्याची माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण टीम व पोलीस पथकाने लग्नमंडप गाठून मुला-मुलीच्या जन्म पुराव्याची चौकशी केली. यावेळी बालीका 18 वर्षाखालील आणि मुलगा 21 वर्षाखालील असल्याची खात्री पटल्यानंतर बालविवाह थांबविण्यात आला. सोबतच दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करण्यात आले.
मुलीकडचे व मुलाकडचे हे दोन्ही मंडळी नागभिड तालुक्यातील रहिवासी असून ते चामोर्शी शहरात फेब्रुवारी महिन्यात रोजगाराच्या शोधात (भटकंती जमात) आले होते. तसेच एक दिवसा आधी त्यांनी हळदीचा कार्यक्रम पण पार पाडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता वधू व वरांकडील नातेवाईकांच्या उपस्थितीत बालविवाह चामोर्शी येथे होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण टीम व पोलीस पथकाने विवाह स्थळी भेट दिली. मुला-मुलीच्या जन्म पुरावाची तपासणी करीत दोन्ही कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले. मुलीच्या आई वडिलांकडून मुलीचे 18 वर्ष व मुलाचे 21 वर्ष पूर्ण होइपर्यंत बालिकेचे विवाह करणार नाही, असे हमी पत्र लिहून घेतले. तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले यांच्या उपस्थितीत वधू पक्ष यांना एकत्र बसवून बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व कायद्यानुसार होणारी कार्यवाही याबाबत माहिती देण्यात आली.
सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, पोलीस स्टेशन चामोर्शीच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ, बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे, पोलीस स्टेशनचे पोलीस जीवन हेडावू, सामाजीक कार्यकर्ते जयंत जथाडे, क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार यांनी केली. अशाप्रकारे जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाइल्ड लाईन टोल फ्री नंबर,1098 वर संपर्क करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post Comment
No comments