Breaking News

चितळाची शिकार ; चार जणांच्या घरातून मांस जप्त


अटक केलेल्या आरोपींसह वनविभागाचे अधिकारी

- कुनघाडा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाची कारवाई
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या कुथेगाव येथील चार जणांच्या घरातून चितळ या वन्यप्राण्याच्या मांसाचे तुकडे व शिकारीसाठी वापरलेले धारदार शस्त्र जप्त केल्याची कारवाई कुनघाडा वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांनी बुधवारी केली. याप्रकरणी विठ्ठल मेसो हलामी, गजानन बुधू पोटावी, सुधाकर डोकू उसेंडी, रामचंद्र येसू कड्यामी सर्व रा. कुथेगाव यांना अटक करण्यात आली आहे.
कुनघाडा वनपरिक्षेत्रअंतर्गत येणा-या जंगल परिसरात चितळाची शिकार करण्यात आल्याची गोपनीय माहिती  मिळाली. या माहितीच्या आधारे वनाधिका-यांनी 8 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कुथेगाव येथे जाऊन संशयीत आरोपीच्या घराची पाहणी केली. यावेळी घरात वन्यप्राण्याचे कापलेले मांस, शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या जाळ्या (वाघरी) सत्तूर, विळा आदी साहित्य जप्त करण्यात आले. याअंतर्गत संबंधितांवर वनगुन्हा नोंदविण्यात आला. चारही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची वनकोठडी सुनावली होती. या वनकोठडी अंतर्गत आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी आणखी सहा इसम सहभागी असल्याची माहिती दिली. त्यामुळे चितळ शिकार प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याचे संकेत आहेत.
सदर कारवाई कुनघाडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एन. तांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुनघाडाचे क्षेत्रसहायक ए. एम. मडावी, पावीमुरांडाचे एस. पी. गव्हारे, मुरमुरीचे वनरक्षक वर्षा डी. मडावी, गणपूरचे वनरक्षक इंदूबाई आर. भेंडेकर, पावीमुरांडाचे पी. एम. कोराम, संगणक चालक नंदू वाघाडे यांनी केली. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, कुनघाडा वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. तांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जोगनाचे क्षेत्रसहायक आर. पी. धाईत, कुथेगावचे वनरक्षक एन. बी. गोटा हे करीत आहेत. 
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 
चितळ शिकार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारही  आरोपींना 9 मार्च रोजी प्रथम श्रेणी न्यायालय चामोर्शी येथे हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 23 मार्चपर्यंत म्हणजेच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाचे आदेशानुसार चारही आरोपींना कारागृह अधिकारी, जिल्हा कारागृह चंद्रपूर यांचे सुपूर्द करण्यात आले.


No comments