Breaking News

गट्टेपायली ग्रामस्थांनी उभारला दारूबंदीचा 'विजयस्तंभ'



GADCHIROLI TODAY
 गडचिरोली : धानोरा तालुक्यातील गट्टेपायली येथे ग्रामसभेच्या निर्णयातून अनेक वर्षापासून अवैध दारूविक्री बंद आहे. हि बंदी पुढेही टिकून राहावी, गावात एकोपा राहावा या हेतूने जागतिक महिला दिनानिमित्त मुक्तीपथ गाव संघटनेच्या वतीने गावामधे विजयस्तंभ उभारून दारूबंदीचा विजय महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. 
धानोरा तालुक्याच्या दुर्गम भागातील गट्टेपायली हे ८५ घरांचे छोटेसे गाव आहे. या गावातील नागरिकांच्या एकीमुळेच अवैध दारूविक्री गावात पूर्णपणे बंद आहे. ही दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांचा मोलाचा वाटा आहे. गावाच्या प्रवेशद्वारावर विजयस्तंभ लावून इतर गावांना प्रेरणा मिळावी, हा मुख्य हेतू ठेवून विजयस्तंभ उभारण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त दारूबंदीचा विजय महोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार गाव संघटनेच्या माध्यमातून गावातून दारूबंदीची मशाल घेऊन रॅली काढण्यात आली. यावेळी दारू बंदीच्या नाऱ्यानी संपूर्ण गाव दुमदुमले. 
या महोत्सवानिमित्त घरोघरी अंगणात सडा-सारवन व रांगोळ्या टाकल्या. जणू काही दिवाळी सणासारखे गावात वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, गावामधून मशाल रॅली काढून मुक्तिपथ अभियानाचे उपसंचालक संतोष सावळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयस्तंभाचे उद्घाटन, गावपाटील व सरपंच श्री परसे यांच्या हस्ते करण्यात आले. सोबतच गाव संघटनेच्या वतीने महिलांची कब्बडी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या उपक्रमात गावातील सर्व महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग बघावयास मिळाला. या गावाने या निमित्ताने मोठा आदर्श निर्माण केला असून इतर गावांनी प्रेरणा घ्यावी अशी हि घटना आहे. याचे पूर्ण श्रेय गावातील महिला, सरपंच व गावकरी बांधवाना जाते.   
कार्यक्रमाला मुक्तिपथ संघटक अक्षय पेद्दीवार, मुक्तिपथ कार्यकर्ते राहुल महाकुलकर, शुभम बारसे उपस्थित होते. विजय महोत्सवाच्या यशस्वितेसाठी पापिता हलामी, सुनिता आतला, शकीला परसे, मंदा दुगा, वणमाला मडावी,  सरपंच दूधराम परसे, गाव पाटील पांडुरंग परसे, ग्रामसभा अध्यक्ष अशोक उसेंडी ,रामदास गावडे,काशिनाथ हीचामी, विश्वनाथ हीचामी यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले.

No comments