Breaking News

७ / १२ नाही तर योजनांचा लाभ घेणार कसा ? : ४० घरांचे 'हे' गाव त्रस्त



गडचिरोली TODAY 
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील तुमिरकसा हे गाव महसूल विभागात समाविष्ट नसल्याने माडिया जातीच्या ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या गावातील रहिवाशांना शासनाकडून सातबारा मिळत नसल्याने त्यांना विविध योजनांपासून मुकावे लागत आहे. त्यामुळे सदर गावाला महसूल गाव घोषित करण्याची मागणी ग्रापं सरपंच यांच्यासह गावातील अन्यायग्रस्त नागरिकांतून केली जात आहे. 
तुमिरकसा गावात ४० घरांची वस्ती असून २०० एवढी लोकसंख्या आहे. हे गाव ६३ वर्षांपासून अस्तित्वात असून या गावात १०० टक्के आदिम जमातीचे लोक राहतात. यापूर्वी हस्तलिखित सातबारा तहसील कार्यालयाकडून प्राप्त होत होता. मात्र, हे गाव महसूल विभागात समाविष्ट नसल्याने ग्रामस्थांना ऑनलाईन सातबारा मिळणे मुश्किल झाले आहे. परिणामी ग्रामस्थांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे तुमिरकसा गावाला महसूल गाव घोषित करून सातबारा देण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 
यासंदर्भातील निवेदन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी या कार्यालयाच्या मार्फतीने राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण समितीचे सहायक आयुक्त यांना पाठविण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी ग्रापं मेडपल्लीचे सरपंच निलेश वेलादी, ग्रामकोष समितीचे अध्यक्ष महारु तलांडी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिवाकर तलांडी, बाबुराव तलांडी, मल्लेश तलांडी, देसू तलांडी, चरणदास नैताम आदी उपस्थित होते.

No comments