गडचिरोली महा मॅरेथॉन स्पर्धा : आदिवासी विकासासाठी हजारो नागरिकांनी लावली एक धाव
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने 'एक धाव आदिवासी विकासासाठी' या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद मैदानावर भव्य महा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन पार पडले. अतिशय जल्लोषपूर्ण व उत्साहाच्या वातावरणात गडचिरोली जिल्ह्यातील ९ ते १० हजार युवक युवती व नागरिकांनी मॅरेथॉन स्पर्धा पुर्ण केली.
या महा मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, अपर पोलीस महासंचालक प्रविण साळुंके, पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, न्यायाधिश आर. आर. पाटील, चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रविद्रसिंग परदेशी, वनसंरक्षक किशोर मानकर, उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मैनक घोष, उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता, कमान्डट १ बटा केरिपुबल आर. एस. बाळापूरकर, ३७ वटा, केरिपुबल कमान्डट एम. एच खोब्रागडे यांच्या उपस्थितीत पार पडले.
सदर महामॅरेथॉन स्पर्धेसाठी मायाश्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज वडसा, भूमी एंपायर, अजयदिप कंन्स्ट्रक्शन, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँक, हल्दीराम्स, डी. सी. गुरुबक्षानी, हर्ष ज्वेलर्स आरमोरी, वायुनंदन पॉवर लिमीटेड, धात्रक ब्रदर्स, स्वागत सेलिब्रेशन आरमोरी, महात्मा गांधी विद्यालय आरमोरी, बी. एफ. मेहता अॅण्ड कंन्स्ट्रक्शन कंपनी, देशमुख बोअरवेल्स, सी. एस. घारपुरे, व्ही. बी. बोम्मावार, वेन्सर कंन्स्ट्रक्शन व टायगर ग्रुप यांनी हातभार लावून मोलाचा वाटा उचलला. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा, धानोराचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव, पेंढरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मयुर भुजबळ व इतर सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व शाखा प्रभारी अधिकारी व अंमलदार, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे सर्व अधिकारी, अंमलदार यांनी सहकार्य केले.
गडचिरोली सारख्या नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या व्यापक स्वरुपात महामॅरेथॉन स्पर्धा पार पडली. जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील युवक युवतींच्या कलागुणांना वाव मिळावा व प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे नाव उंचवावे या उदात्त हेतूने गडचिरोली पोलिस दलाने वेगवेगळ्या स्पर्धा व मेळाव्यांच्या माध्यमातून नेहमीच पाठबळ दिले आहे. स्पर्धेमागचा उद्देश देखिल हाच होता की, जिल्ह्यातील युवक, युवतींनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर या महामॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन एक चांगली कामगिरी करावी.
जेष्ठ नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद
महा मॅरेथॉन स्पर्धा ही ३ किमी, ५ किमी व १० किमी अशा वेगवेगळ्या तीन प्रकारात घेण्यात आली. प्रत्येक प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय अशा एकुण ९ महिला व पुरुषांनी विजेतेपद पटकाविले. तसेच जेष्ठ नागरिक या गटातील एकुण ३ महिला व ३ पुरुषांनी विजेतेपद पटकाविले. ३ किमी स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार, ८ हजार व ५००० रुपये रोख, ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र, ५ किमी स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, ११ हजार व ८ हजार रुपये रोख, ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र व १० किमी स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार , १५ हजार व ११ हजार रुपये रोख, ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
झुंबा डीजेने वाढविला युवकांचा उत्साह
मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना टी-शर्ट, गुडी बॅग, पदक व सहभागीतेचे प्रमाणपत्र तसेच नाश्ता देण्यात आला. स्पर्धकांचा उत्साह वाढावा, यासाठी झुंबा डीजेची सोय करण्यात आली होती. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर करण्यात आले. सदर स्पर्धा ही जिल्हा परिषद मैदानापासून सुरु होऊन चंद्रपूर रोडवरील आयटीआय चौक, रिलायंस पेट्रोलपंप, कारगील चौक, इंदीरागांधी चौक, ट्रेंड्स मॉल पासुन परत जिल्हा परिषद मैदान या मार्गे घेण्यात आली.
No comments