Fraud ; खातेदारांना लाखोंचा गंडा घालणारा ठगबाज अखेर जाळ्यात
-गडचिरोली पोलिसांनी पाच दिवसात लावला फरार आरोपीचा शोध
गडचिरोली TODAY
गडचिरोली : शहरातील विजया महिला नागरी पतसंस्था मर्या ३०६ येथे व्यवस्थापक तसेच अभिकर्ता म्हणून कार्यरत असलेला मंगेश नरड याने भरपूर व्याजासह परतावा देण्याचे आमिष दाखवीत अनेक गुंतवणूकदारांची ६७ लाख ३१ हजार ६५० रुपयांनी फसवणूक करीत पळ काढला होता. सदर गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर गडचिरोली पोलिसांनी तपासाची वेगवान चक्रे फिरवीत अवघ्या पाच दिवसात ठगबाज फरार एजंटला बेड्या ठोकल्या आहेत.
शहरातील विजया महिला नागरी सहकारी पतसंस्थेत कार्यरत अभिकर्ता तसेच व्यवस्थापक मंगेश नरड याने शहरापासून जवळच असलेल्या नवेगावसह परिसरातील काही कुटुंबाकडून मुदतबंद ठेवी स्वरूपातील मौल्यवान रोखे, दैनिक पिग्मीबचत योजनांचे पासबुक गैरमार्गाने वापरून मौल्यवान रोखे हे बनावट असल्याचे सक्षम कारण माहित असतांना सुद्धा कपटीपणाने त्याववर अधिकृत अध्यक्षा तथा संचालिका यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून फेरबदल केला. तसेच गुंतवणूकदारांना विश्वासात घेऊन सदर पतसंस्थेमध्ये इतर राष्ट्रीयकृत बँका पेक्षा मोठ्या प्रमाणात व्याजाचा दर असल्याचे सांगून गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले व दिलेले रोखे हे खरे असल्याचे भासवून त्यांच्याकडून मुदतबंद ठेवी, आरडी तसेच दैनंदिन पिग्मी बचत योजनेच्या माध्यमातून एकूण ६७ लाख ३१ हजार ६५० रुपयांची गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केली. पतसंस्थेमध्ये गुंतवणूक केलेल्या मुदतबंद ठेवींचा कालावधी पूर्ण झाल्याने संबंधित गुंतवणूकदार हे संबंधित एजंटकडे पैशाची मागणी करायला सुरवात केली असता, आरोपी मंगेश नरड याने ३० जानेवारीपासून स्वतःचा तसेच आपल्या पत्नीचा मोबाईल बंद करून गडचिरोली येथून फरार झाला होता. अखेर गडचिरोली पोलिसांनी अवघ्या पाच दिवसात आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
सिंदेवाही येथून आरोपीस अटक
गडचिरोली पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच तो अटक चुकविण्याकरिता स्वतःचे अस्तित्व लपवून पोलिसांची दिशाभूल करून वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करीत होता. तरी मात्र तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांनी अहोरात्र परिश्रम करून फरार आरोपीच्या वास्तव्याची खात्रीशीर माहिती संकलित केली. दरम्यान, २४ फेब्रवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथून आरोपी मंगेश नरड यास अटक करण्यास गडचिरोली पोलिसांना यश आले.
४ मार्च पर्यंत पोलिस कस्टडी
गुंतवणूकदारांसोबत ठकबाजी करून फरार असलेल्या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी अवघ्या पाच दिवसात अटक केली. सदर आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालया समक्ष हजर केले असता, ४ मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. तसेच या प्रकरणात सक्रिय असलेल्या इतर आरोपींची भूमिका स्पष्ट होताच त्यांना अटक करण्याची तजवीज ठेवली आहे. तरी ज्या गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाली आहे, त्यांनी तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post Comment
No comments