शेतकऱ्यांना आनंद देणारा जीआर निघाला : हेक्टरी मिळणार १५ हजार बोनस
गडचिरोली TODAY
गडचिरोली : नागपुरातील हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारने विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. परंतु, दोन महिने उलटूनही बोनसचा थांगपत्ता नव्हता. त्यामुळे शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत होते. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून राज्य शासनाने शुक्रवारी धानाच्या बोनस बाबतचा जीआर काढला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रति हेक्टर १५ हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर बोनस राशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. नोंदणीकृत शेतकऱ्यांव्यतिरित अन्य व्यक्तींना बोनस दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित अभिकर्ता संस्थांनी जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे.
या अटींचे पालन करणारे शेतकरी पात्र
नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची खातरजमा करून जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुज्ञेय राहील. धान उत्पादक शेतकरी आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशन या दोन अभिकर्ता संस्थांकडून सुरु केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असला पाहिजे. बोनस मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे बंधनकारक नाही. शेतकऱ्याने सादर केलेला सातबारा उतारा त्यावरील धान लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्रफळानुसार बोनस निश्चित करण्यात यावा. यासाठी महसूल विभागाने विकसित केलेल्या ई पीक पाहणी ऍपद्वारे संकलित केलेल्या माहितीचा आधार घ्यावा. एखादा शेतकरी दोन्ही अभिकर्ता संस्थांकडे नोंदणीकृत असल्यास त्याच्या एकूण जमीन धारणेनुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत बोनस राशी देय राहील. या अटींचे पालन करणारे शेतकरी बोनससाठी पात्र ठरणार आहेत.
Post Comment
No comments