पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रंगोत्सव साजरा करून कामाचा तणाव केला दूर
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : होळी व रंगपंचमीच्या दोन दिवसीय सणात कुठेही विपरीत घटना घडू नये, यासाठी गडचिरोली पोलिसांनी शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्याबरोबरच दारू विक्रेत्यांवर कारवाई केली. शहरवासीयांनी उत्साहात सण साजरा केल्यानंतर रंगोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गडचिरोली शहर ठाण्यात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रंगोत्सव साजरा करून कामाचा तणाव दूर सारला.
राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित मोर्चे, आंदोलन तसेच सण, उत्सवात पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवावा लागतो. अशा स्थितीत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तणावाखाली काम करावे लागते. असे असतानाही येथील नागरिकांना सुरक्षा देण्याची जबाबदारी पोलिस विभागाकडून सातत्याने पार पाडली जात आहे. दरम्यान, होळीचा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही घटना घडू नये, यासाठी शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन दिवसाच्या तणावातून मुक्त झाल्यानंतर रंगोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शहर पोलिस ठाण्यात काही काळ दैनंदिन कामातून मोकळे होत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रंगोत्सव साजरा केला.
Post Comment
No comments