Breaking News

वडेगाव ग्रापंवर प्रशासक राज येण्याची शक्यता ; सरपंच, उपसरपंच, सदस्याचे सदस्यत्व रद्द



- जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
GADCHIROLI TODAY
कुरखेडा : तालुक्यातील वडेगांव गटग्रामपंचायत येथील सरपंच, उपसरपंच व एका सदस्याचे सदस्यत्व ग्रामपंचायत कामाचा मोबदला उचल करण्यात तसेच त्यांच्या कुटूंबाचे हितसंबंध असल्याच्या आरोपावरून जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या विविध कलमान्वये रद्द केले आहे. त्यामुळे सदर ग्रामपंचायतवर प्रशासक राज येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वडेगाव गट ग्रामपंचायत कार्यालयात 11 सदस्यीय कार्यकारी मंडळ आहे. येथील सरपंच पदावर जमना जमकातन तर उपसरपंच पदावर भाग्यवान जनबंधू मागील दोन वर्षापासून कार्यरत आहेत. दरम्यान, येथील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय कोरेटी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सरपंच जमना जमकातन यांचे पती सरपंच पदावर कार्यरत असताना ग्रामपंचायतच्या सार्वजनिक विहिरीच्या गाळ उपसा कामावर मजूर म्हणून काम करीत त्याचा मोबदला उचलला. तसेच एप्रिल 2021 ची मासिक सभा कोरम अभावी तहकूब झाल्याने ती त्याच महिन्यात घेणे बंधनकारक असताना ती घेण्यास कसूर केली, असा आरोप करीत तक्रार दाखल केली. तर उपसरपंच भाग्यवान जनबंधू यांच्या वडिलांच्या नावावर असलेला ट्रॅक्टर जून 2021 मध्ये ग्रामपंचायतच्या कचरा कुंडीतील कचरा उचल करण्याच्या कामावर लावून त्याचा मोबदला म्हणून 13 हजार रूपये घेण्यात आले. तसेच सार्वजनिक हातपंपावर इलेक्ट्रिक मोटर बसवू त्याचा वापर करीत असल्याचा आरोप तक्रारीत केला. तसेच ग्रामपंचायत सदस्य रजनी बंसोड यांच्या पतीच्या नावावर असलेला ट्रॅक्टर जून 2021 मध्ये ग्रापंच्या कचरा कुंडीतील मलमा सफाईच्या कामावर लावून त्याचा मोबदला म्हणून 14 हजार रुपयांची उचल केल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे संजय कोरेटी यांनी केली होती. जिल्हाधिकारी यांच्या दालनात दोन्ही गटाची बाजू एकूण घेत सूनावनी करताना जिल्हाधिकारी यांनी तक्रारदाराची तक्रार ग्राह्य धरत विद्यमान सरपंच जमकातन, उपसरपंच जनबंधू व सदस्य बंसोड यांच्या विरोधात ग्रामपंचायत अधिनियम 1959 मुंबई अधिनियम क्र 3 चे कलम 14 (1) (ग) अन्वये कार्यवाही करून त्यांचे सदस्यत्व रद्द केले. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. एकाच वेळी सरपंच, उपसरपंच व एक सदस्याचे पद रद्द झाल्याने नविन व्यवस्था होईपर्यंत प्रशासक राज निर्माण होण्याची शक्यता आहे‌.

No comments