नालीवरील अतिक्रमण भोवले ; शौचालय, बाथरूमसह सदस्यपदही गेले
- मोहुर्ली येथील प्रकरण
गडचिरोली TODAY
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत मोहुर्ली येथील महिला सदस्याने नालीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी कारवाई होण्याचे संकेत मिळताच जेसीबी लावून शौचालय व बाथरूमचा खालचा भाग पाडून टाकला होता. मात्र चौकशी दरम्यान उर्मिला मडावी यांनी शासकीय नालीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचे सदस्यपद अपात्र ठरवण्यात आले.
ग्रामपंचायत सदस्य असलेल्या उर्मिला ढिवरु मडावी यांनी शासकीय नालीवर अतिक्रमण करून शौचालय व बाथरूमचे बांधकाम केले होते. याबाबत ग्रा.प.सदस्य मारोती आगरे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांचेकडे तक्रार दाखल करुन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(1) (ज- 3) नुसार कारवाई करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असल्याचे समजताच कारवाईपासून वाचण्यासाठी उर्मिला मडावी यांनी जेसीबी लावून शौचालय व बाथरूमचा खालचा भाग पाडून टाकला होता. मात्र चौकशी दरम्यान उर्मिला मडावी यांनी शासकीय नालीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने 14 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी त्यांना पदावर राहण्यास अनर्ह ठरविले असून सदस्य पद रिक्त झाल्याचे घोषित केले आहे. यामुळे उर्मिला मडावी यांचे शौचालय व बाथरूमही गेले आणि सदस्यपदही गेले असल्याची परिसरात चर्चा आहे.
Post Comment
No comments