कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळ जखमी
GADCHIROLI TODAY
अहेरी : जंगलातून गावाकडे आलेल्या चितळावर कुत्र्यांनी झडप घातल्याने यात चितळ गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील वेलगूर येथे घडली. मात्र वेळीच गावातीलच स्वराज्य फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी कुत्र्यांना पिटाळून लावल्याने चितळाला जीवदान मिळाले.
वेलगूर येथील जंगल परिसरातून एक चितळ गावालगत आले. दरम्यान गावातील भटक्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला. जीव वाचविण्याच्या आकांताने चितळाने थेट गावाकडे धाव घेतली. मात्र गावात कुत्र्यांनी चितळावर झडप घालित चावा घेतला. यात चितळ गंभीर जखमी झाले. दरम्यान वेलगूर स्वराज्य फाऊंडेशनचे पदाधिका-यांना कुत्रे चितळाचे लचके तोडित असल्याचे निदर्शनास येताच कुत्र्यांना हाकलून लावले. त्यांच्या या कृतीने सदर चितळाला जीवदान मिळाले. त्यानंतर पदाधिका-यांनी आलापल्ली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून जखमी चितळाला त्यांच्या स्वाधीन केले. चितळाचे प्राण वाचविण्याकरिता स्वराज्य फाऊंडेशचे प्रितम राऊत, अक्षय सात्रे, रोहित गौतरे, शंतनू मुजूमदार, महेश राऊत, रुपेश शेंडे, रोहित गलबले, दीपक चुनारकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Post Comment
No comments