Breaking News

शोभा फडणवीस यांची मोहगाव गोटूल स्कूलला भेट

गडचिरोली TODAY 
धानोरा : तालुक्यातील मोहगाव ग्रामसभेने 2 वर्षापूर्वी गोंडी भाषेतून सुरु केलेल्या शाळेला महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री शोभा फडणविस यांनी भेट देवून शाळेचे कौतुक केले. सोबतच परिसरातील समस्यांवर चर्चा केली. 
गावकऱ्यांशी चर्चा करताना शोभाताई फडणवीस
आपली बोलीभाषा व संस्कृती अबाधित राहावी, याकरिता मोहगाव ग्रामसभा गोंडी, इंग्रजी, हिन्दी, मराठी या सर्व भाषेतून शिक्षण देत आहे. परंतु सन 2022 मध्ये शिक्षण विभागाकडुन सदर शाळा अनधिकृत ठरविण्यात आली. 1 लाख रुपयाचा दंड ठोठावला. याविरोधात मोहगाव ग्रामसभेने शासनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या व इतर सर्व समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्षात माजी मंत्री शोभा फडणविस यांनी मोहगाव ग्रामसभेला भेट दिली. यावेळी त्यांनी परिसरातील सर्व समस्यांवर चर्चा केली. 
यावेळी गोंडी शाळेला मान्यता द्यावी, शेतकऱ्यांच्या धान्य विक्रीसाठी मर्यादा वाढवून द्यावी, जिप अंतर्गत रस्त्याचे व पुलाचे बांधकाम करावे, सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून द्याव्या आदी समस्यांवर शोभा फडणवीस यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. गोंडी शाळेला शासन मान्यता देण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावणार, शेतक-यांच्या धान्य विक्रीची मर्यादा वाढवून देण्याबाबत आदिवासी आयुक्तांशी बोलून लगेचच पत्र काढण्यात येईल, अशी हमी शोभाताईंनी दिली. 
यावेळी माजी जिप सदस्य श्रीनिवास दुल्लमवार, पेंढरीचे सरपंच पवन येरमे, निरज पटेल, अनिल संतोषवार, सौरभ केदार, अविनाश जगताप, महेंद्र करकाळे, देवसाय आतला, बावसु पावे, कृषी अधिकारी तुमसरे, तालुका कृषी अधिकारी पाल, दिनेश पानसे, इलाखा प्रमुख गावडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन माणिक हिचामी यांनी तर आभार ग्रामविकास अधिकारी जयंत मेश्राम यांनी मानले
 

No comments