Breaking News

हत्तीणीच्या नवजात पिल्लूच्या मृत्यूप्रकरणी खुलासा : 'या' आजाराने मृत्यू झाल्याची वर्तविली शक्यता


संग्रहित छायाचित्र

GADCHIROLI TODAY 
गडचिरोली : जिल्ह्यातील कमलापूर येथील हत्तीकॅम्पमध्ये 26 फेब्रुवारी रोजी मंगला नावाच्या गरोदर हत्तीणीच्या पिल्लांचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला. याप्रकरणी वनविभागाने खुलासा दिला असून शवविच्छेनाच्या प्राथमिक अहवालावरुन सदर पिलाचा मृत्यू 'हर्पिस' या आजाराने झाल्याची शक्यता वर्तविली आहे.  
 मंगला मादा हत्तीच्या गर्भधारणेअंती जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान प्रसुती होईल असा अंदाज होता. त्याप्रमाणे पशु वैद्यकिय अधिकारी हे कॅम्प येथे भेट देत सदर हत्तीणीवर लक्ष देवून होते. प्रसुतीपर्यंत सदर मादा हत्तीणी मध्ये कोणतेही अनुचित लक्षणे अथवा आजारी असल्याचे लक्षणे दिसली नव्हती. दरम्यान 27 फेब्रुवारी रोजी कमलापूर वनपरिक्षेत्रातील जंगलात मादी हत्तीणने पिल्लाला जन्म दिल्याचे येथील कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. मात्र, नवजात पिल्लु मृत आढळले. हत्तीण प्रसुतीदरम्यान समुहातुन स्वतःला एकटी करुन घेत असून तिची नैसर्गिकरित्या प्रसुती होत असते. यापूर्वी सर्वच प्रसुती अशाच झाल्याचे वनविभागाने कळविले आहे. मृत पिल्लाच्या शवविच्छेदनाअंती प्राथमिक अहवालावरुन नवजात पिल्लूला हर्पिस आजार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तपासणीसाठी अवयवांचे नमुने गोळा केले आहेत व डब्ल्यूआरटीसी गोरेवाडा- नागपुर येथे पाठविले आहेत. तसेच सदर नमुने वायनाड व जबलपुर येथील प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. 
संग्रहित छायाचित्र
यापूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये सई नामक मादा (2 वर्ष 8 महिने) व अर्जुन नामक नर (2 वर्ष 7 महिने) यांचाही मृत्यु हर्पिस (ईईएचव्ही) मुळे झाला असल्याचे निदान झाले होते. मृत्यूपूर्वी हत्तींमध्ये कोणतीही लक्षणे न दिसल्याने अकस्मात मृत्यूची नोंद त्यावेळी करण्यात आली होती. हर्पिस व्हायरस हे जगातील हत्तीचे मृत्युच्या कारणांमधील प्रमुख कारण आहे. सदर विषाणुची लागण झाल्यानंतर 8 ते 24 तासामध्ये मृत्यु ओढावू शकतो. हा आजार प्रामुख्याने हत्तीच्या पिल्लांमध्ये आढळतो. सदर विषाणूकरिता लस उपलब्ध नाही. या विषाणूच्या बचावासाठी हत्तींची नियमित तपासणी व आजाराचे लक्षणावर बारीक निगराणी, तसेच लक्षणे दिसल्यास त्यावर तात्काळ उपचार हाच उपाय आहे. दर 15 दिवसांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर येथील पशुवैद्यकिय अधिकारी यांचेकडून सेवा पुरविण्यासाठी व्यवस्था केली आहे. हत्तीचे वैद्यकिय तपासणीसाठी सिरोंचा वनविभागाची संपुर्ण यंत्रणा दक्ष असून तत्काळ वैद्यकिय उपचार दिले जात असल्याचे वनविभाग प्रशासनाने कळविले आहे.

प्रत्येक हत्तीमागे 2 कर्मचारी उपलब्ध 

कमलापुर शासकिय हत्तीकॅम्प येथे 5 महावत व 4 चारा कटर असे एकूण 9 स्थायी कर्मचारी आहेत. यातील 3 महावत 10 वर्षांपासून, 1 महावत 30 वर्षे तर 1 महावत 14 वर्षांपासून कार्यरत आहेत. 4 चारा कटर 10 वर्षापासून कार्यरत आहे. सोबतच कमलापुर गावातील 10 हंगामी वनमजुर त्यांना मदत करीत आहेत. प्रत्येक हत्तीमागे 2 कर्मचारी उपलब्ध आहेत. या कर्मचाऱ्यांना हत्ती साभाळण्याचा दिर्घ अनुभव आहे. त्यांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न चालू आहेत. सदर कॅम्पचे काम सबंधित नियतक्षेत्राचे वनरक्षक, वनपाल पाहत असून व्यवस्थापन वनपरिक्षेत्र अधिकारी, कमलापुर हे पार पाडित असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

No comments