Breaking News

विविध न्याय मागण्यांसाठी दिव्यांग धडकले तहसील कार्यालयावर



-मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन 
GADCHIROLI TODAY 
धानोरा : दिव्यांग व्यक्ती, एकल महिला व वृद्ध पेन्शनधारकांच्या विविध मागण्यांना घेऊन विविध संघटनाच्या नेतृत्वात शेकडोंचा मोर्चा धानोरा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी शिष्टमंडळाने तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी जाधव यांच्याशी विविध समस्यांवर चर्चा करून त्यांच्यामार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. 
सर्व पेन्शनधारकांना १ हजार मानधनाऐवजी वाढीव मानधन ५ हजार करण्यात यावे. वेळेत मानधन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे, दिव्यांग, एकल महिला, तृतीयपंथी यांना विनाअट घरकुल योजनेचा लाभ द्यावा, दिव्यांग, वृद्ध, एकल महिला, निराधार यांना दिल्ली आणि पंजाब राज्याप्रमाणे घरगुती वीज २०० युनिट पर्यंत वीजबिल आणि शेतकऱ्यांना १०० युनिट पर्यंत वीजबिल माफ करण्यात यावे, प्रत्येक तालुक्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र मंत्रालय बांधकामासाठी जागा उपलब्ध करून मंत्रालय उभारून देण्यात यावे, बस प्रवासामध्ये दिव्यांग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना  १०० टक्के सुटीची सवलत देण्यात यावी, दिव्यांग व्यक्तीला घरपट्टे आणि शेतीचे मालकी पट्टे कोणतेही जाचक अट न लावता देण्यात यावे, ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांग व्यक्तीला स्वीकृत सदस्य म्हणून संधी देऊन दिव्यांग व्यक्तीच्या प्रश्नाला वाचा फोडावी, २५ जून २०१८ च्या  शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तीच्या गृह करामध्ये ५० टक्के सुट देण्यात यावी, १७ जुलै २०१३ च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तीला अन्तोदय योजनेमध्ये समाविष्ट करून रेशनचा लाभ देण्यात यावा, धानोरा तालुक्यातील दिव्यांग पूर्वसन केंद्र पुर्वरत सुरु करण्यात यावे, दिव्यांग व्यक्तीचे UDID ( स्वावलंबन ) कार्ड त्वरित वाटप करून योजनेच्या प्रवासात समाविष्ट करण्यात यावे, आंतर जातीय विवाह आणि व्यंगीत - अव्यंगीत विवाह प्रोत्साहन योजनेचे लाभांश वेळेत जमा करण्यात यावे, १ एप्रिल २०२१ नुसार दिव्यांग व्यक्तीच्या तक्रारी निवारण्यासाठी पंचायत समितीमध्ये तक्रार निवारण समिती गठीत करण्यात यावी, दिव्यांग व्यक्तीची नौकर भरती करून त्यानाही सेवेची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, दिव्यांग व्यक्तींना शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी, ४ सप्टेंबर २०२० नुसार पंचायत समितीस्तरावर दिव्यांग व्यक्ती सल्ला व मार्गदर्शन केंद्र उभारून सर्व कायदे व योजनाची माहिती दिव्यांग व्यक्तींना सहज उपलब्ध करून द्यावे आदी मागण्यांसाठी सर्वांगीण दिव्यांग संघटना, विदर्भ विकलांग संघटना, सर्वे पेन्शनधारक आणि दिव्यांग व्यक्ती बचतगट यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. 

सदर मोर्चामध्ये शेकडो दिव्यांग, वृद्ध पेन्शनधारक व एकल महिला सहभागी झाले होते. त्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. या शिष्टमंडळात विकलांग व्यक्तीचे अधिकार विषय समन्वयक संगिता तुमडे, विदर्भ विकलांग संघटनेचे अध्यक्ष यशवंत पाटणकर, सर्वांगीण दिव्यांग संघटना तालुका अध्यक्ष प्रकाश मारभते, अतुल शिंपी, प्रकाश जेंगठे, कृष्णा सोनटक्के, प्रतिभा शेंडे, तारा मडावी यांचा सहभाग होता. 
उपजिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा 

मोर्चाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी जाधव यांच्यासोबत विविध मागण्याविषयी चर्चा केली. यावेळी जाधव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तुमच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी पाठपुरावा करू, आमच्या स्तरावरील योजनांचा लाभ देऊन तुम्हाला नेहमी सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

No comments